छत्रपती संभाजीनगर – शाळा प्रवेशोत्सव 2025 कार्यक्रमातंर्गत विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आदर्श उच्च प्राथमिक शाळा गाडीवाट, केंद्र कचनेर या शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत केले.
गाडीवाट येथील कार्यक्रमावेळी सहाय्यक शिक्षण उपसंचालक रविंद्र वाणी, प्रशासनाधिकारी समाधान आराख, शिक्षण उपनिरीक्षक डॉ. सतीश सातव, शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी भोसले, मुख्याध्यापक सुदाम राठोड उपस्थित होते.
शाळा प्रवेशोत्सवानिमित्त इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची ट्रॅक्टरमध्ये मिरवणूक काढण्यात आली. पहिलीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे “माझे पहिले पाऊल ठसा” व “माझे भविष्या माझ्या हाती हाताचा ठसा” घेण्यात आला.
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके व गणवेश वाटप करण्यात आले. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी विद्यार्थी तसेच शाळेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची असून विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांनी समर्पित भावनेने काम करावे, विद्यार्थ्यांनी अभ्यास करुन आपले नाव मोठे करावे, असे आवाहन त्यांनी केले.
संयोजन दादासाहेब नवपुते, जयराम बोर्डे, श्रीमती श्रीपत यांनी केले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.